भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. भाजपाने पहिल्या यादीद्वारे १९५ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या यादीद्वारे उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून दुसऱ्यांदा आणि संरक्षणंमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. हे नाव वाचून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या नावावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आक्षेप नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (३ मार्च) रात्री मुंबईतल्या धारावी येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, साधी गोष्ट सांगतो भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कुणाची नावं आहेत? मोदी-शाह यांची नावं आहेत. पण, आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी नावं माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले. युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस.. त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. परंतु, मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे, बेहिशेबी मालमत्ता साठवून ठेवल्याचे आरोप केले होते. त्या कृपाशंकर सिंहचं नाव पहिल्या यादीत आहे. परंतु, नितीन गडकरींसारख्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचं नाव या यादीत नाही. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ ही भाजपाची जाहिरात होती ना.. आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या वेळी (लोकसभा निवडणूक २०१९) युतीचे ४२ खासदार निवडून आले नसते तर दिल्लीचं तख्त राहिलं नसतं. महाराष्ट्रगीतात म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आधी दिल्लीचं तख्त फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिथे निर्माण करावं लागेल. यांची जी काही मिजास आहे ‘अब की बार ४०० पार’ची, पण मी म्हणतो ‘अब की बार भाजपा तडीपार’.आगामी निवडणुकीत आपल्याला यांना तडीपार करायचं आहे आणि दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवायचा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray angry bjp gave kripashankar singh lok sabha ticket before nitin gadkari asc
Show comments