Uddhav Thackeray on Bhaiyyaji Joshi Statement over Marathi : “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी बुधवारी (५ मार्च) रात्री केलं होतं. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जोशींच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, “ही सगळी वक्तव्ये केवळ मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी व मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी चालू आहेत. हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “काल महायुतीच्या आमदारांना ‘छावा’ चित्रपट दाखवला जात होता आणि दुसऱ्या बाजूला संघाचे एक अण्णाजी पंत मुंबईत आले होते. मुंबईत येऊन ते मराठी विरुद्ध अमराठी असं विष कालवून गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आता पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रात, मराठी माणसात फूट पाडणारे औरंगजेब व त्यांना मदत करणारे अण्णाजी पंत या जमान्यातही जन्माला येत आहेत यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. काही लोक असे आहेत जे आम्हीच ब्रह्मदेवाला जन्म दिला अशा आवेशात फिरत असतात व जगाला ब्रह्मज्ञान शिकवत फिरत असतात. ते भैय्याजी जोशी काल मुंबईत घाटकोपरला आले आणि गोमुत्र शिंपडून गेले. मुंबईत राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं गोमूत्र शिंपडून गेले. भारतीय जनता पार्टीचा हा छुपा अजेंडा आहे. भाजपावाल्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत.
उद्धव ठाकरे यांचा भैय्याजी जोशींवर संताप
उद्धव ठाकरे म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून या भाजपावाल्यांनी हिंदुस्थान – पाकिस्तान हा विषय काढला नही. आता ते मराठी विरुद्ध अमराठी, मराठा विरुद्ध मराठेतर अशी फूट पाडून हे राज्य बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या जोशींना आव्हान देतो की त्यांनी असंच वक्तव्य अहमदाबादला जाऊन तिथे करून दाखवावं. तमिळनाडू, केरळ, बंगाल किंवा कर्नाटकला जाऊन अशी भाषा करून तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं. मराठी माणूस सहृदयी, दयाशील आहे म्हणून कोणीही यावं आणि टपली मारून जावं हे चालणार नाही. मराठी माणूस भाजपाच्या खिजगणतीतही नाही. कारण त्यांना वाटतं मराठी माणूस आपल्याशिवाय कुठे जाणार आहे?”