मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे ५ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. दादरमधील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेलाही नंतर एकनाथ शिंदे गटाने जशास तसे उत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता मोठी घोषणा केली आहे. मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.
हेही वाचा >>> शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”
याआधीही मी याबद्दल सांगितलेले आहे. पुढेही सांगत राहीन. लवकरच मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे. मी तुमचे याआधीही आभार मानलेले आहेत. आताही तुमच्या प्रेमबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर अधिकार सांगितला जात आहे. तर नोंदणीकृत पक्षातील नियमावलीचा आधार घेत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याडेच राहील असा दावा उद्धव ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना निवडणूक आयोग काय निकाल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.