“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारमधील नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची योजना आखलेली”, असा गौप्यस्फोट मविआ सरकारमधील तत्कालीन मंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपर्वी एका मुलाखतीवेळी केला होता. शिंदेंच्या मविआवरील या आरोपांवर मविआ नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, फडणवीसांसह अनेक भाजपा नेते काही गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. महाविकास आघाडीचं सरकार त्या गुन्ह्यांप्रकरणी तपास करत होतं. अशाच एका प्रकरणात फडणवीसांचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे त्यांना वाटू लागलं होतं की, आता आपल्याला अटक होणार आहे. त्यामुळेच त्यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी पावलं उचलली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यावर स्वतः फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं होतं. रायगडमधील सभेत फडणवीस म्हणाले, माझी चौकशी करण्यासाठी त्यांनी काही अधिकारी नेमले, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवलं, माझी चौकशीदेखील झाली. त्यात त्यांना काहीच आढळलं नाही.
शिंदे आणि फडणवीसांच्या आरोपांवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, त्या विषयावर मी आता काही बोलत नाही, त्या विषयावर संजय राऊतांनी योग्य उत्तर दिलं आहे. राऊत परवा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावर बोलले आहेत. आज काही वर्तमानपत्रांमध्ये लेख आले आहेत. या लेखांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत यांच्या (महायुती) सरकारने काही नेत्यांना अनेक प्रकरणांमध्ये क्लीन चिट दिली आहे, त्यावर विस्तृतपणे लेखन करण्यात आलं आहे. म्हणजेच ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असेल, शिखर बँकेचा घोटाळा असेल, अशा घोटाळ्यांप्रकरणी त्यांनी वेगवेगळ्या लोकांना क्लीन चिट दिल्या आहेत. मग हे घोटाळे झाले होते की नव्हते? हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे कालपर्यंत तुम्ही काही नेत्यांवर वेगवेगळे आरोप करत होतात. आता हेच लोक तुमच्याकडे आल्यावर त्यांना क्लीन चिट कशा काय मिळतात? लोकांच्या मनातही हा प्रश्न निर्माण झाला असून ते सरकारला हे प्रश्न विचारत आहेत. त्यावर तुम्ही उत्तरं दिली नाही तरी लोकांच्या मनात हे प्रश्न कायम राहणार आहेत. राहिला प्रश्न त्या मुलाखतीचा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुलाखत) तर त्या मुलाखतीबद्दल नाना पटोले खूप योग्य शब्दात बोलले आहेत. पटोले म्हणाले की ते चावीचं खेळणं असतं ना… रोज चावी दिली ते खेळणं चालू राहतं तसा तो सगळा प्रकार आहे.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंचं मत मशालीला नाही, मग कुणाला? उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले, “यावेळी…”
मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले, आपले मुख्यमंत्री बोलतायत की मविआ सरकारने फडणवीस, शेलार आणि दरेकरांना अटक करण्याची योजना आखली होती. मुळात शिंदेंच्या डोक्यात हे कुठून आलं? कारण या लोकांनी काहीतरी केलं असेल ना… विनाकारण कोणी कोणाला का बरं अटक करेल? फडणवीस हे बेकायदा फोन टॅपिंग (दूरध्वनी अभिवेक्षण) प्रकरणात अपराधी होते. त्या प्रकरणी तपास चालू होता. तो तपासत चालू असताना फडणवीसांच्या मनात भीती निर्माण झाली होती की आता कोणत्याही क्षणी आपल्याला अटक केली जाईल. त्यांना माहीत होतं की आपण अपराध केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी त्यांनी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या त्यापैकी एक होत्या. आमचं सरकार त्याप्रकरणी तपास करत होतं.