Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली शाब्दिक जुगलबंदी ही महाराष्ट्र २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हापासून आपण पाहतोच आहोत. पुन्हा एकदा या शाब्दिक जुगलबंदीचा अनुभव महाराष्ट्राला आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जयंत पाटील यांनी एका वृत्तपत्रासाठी घेतली. त्यावेळी रॅपिड फायर राऊंडमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी दोन वाक्यात मत सांगा असं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर मी एका वाक्यातच उत्तर देतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दोघांबाबत एकच वाक्य वापरलं काहीही भरवसा नाही. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

एक ते गाणं होतं ना? कुठलं गाणं होतं? सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का? सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का? असं विचारा त्यांना. ते गाणं आलं तेव्हा त्यांचा सत्कारही वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री होते. सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय? म्हणून तुम्ही दुसरा घरोबा केलाय का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का हे गाणं काय आहे?

सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का? हे गाणं सुप्रसिद्ध आर.जे. मलिष्काचं गाणं आहे. हे गाणं रेड एफ. एम. साठी तिने तयार केलं होतं. २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं तयार करण्यात आलं होतं जे चांगलंच व्हायरल झालं होतं. लोकांना ते आजही स्मरणात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी या गाण्याचाच उपयोग केला आहे हे आज पाहण्यास मिळालं.

मिळालेल्या संधीचं सोनं करा, चिखल करु नका-उद्धव ठाकरे

थडगी उकरायची, आणखी काही काढायचं हे सगळं दिशाभूल करणं सुरु आहे. जनतेने तुम्हाला बहुमत दिलं आहे त्यावर लोकांचा संशय आहे. पण जर तुम्हाला बहुमत मिळालं आहे, सत्तेवर बसण्याची संधी मिळाली आहे तर त्या संधीचं सोनं करा. त्याचा चिखल करु नका. अशीही बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं करु नयेत असं जर का देवेंद्र फडणवीस म्हणाले असतील तर मी त्यांच्या या वक्तव्याचं स्वागत करतो. त्यांच्याकडे जे आगलावे लोक आहेत ते म्हणजे विरोधी पक्ष संपवायला घेतलेलं विष आहे. तेच विष आता भाजपाला मारतं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Story img Loader