Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. माघी गणेशोत्सवात राज्य सरकारने नोटिसा बजवल्या. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे महाकुंभ सुरु आहे. त्यात सर्वजण डुबकी मारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुबकी मारली. पण पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन होणार नाही, अशी नोटीस सरकार बजावत आहे.
पंतप्रधान मोदींनी डुबकी मारली पण…
कुंभमेळा सुरु आहे. महाकुंभात जाऊन अनेक जण डुबकी मारत आहेत. आमच्या पंतप्रधानांनीही डुबकी मारली. पण एकीकडे गणपती मंडळांच्या अध्यक्षांचं पत्र आलं आहे. माघी गणेशोत्सवात ज्यांनी पीओपीच्या मूर्ती स्थापन केल्या होत्या त्यांचं विसर्जन करायचं नाही अशी त्यांना नोटीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन करायचं नाही? हे कुठलं हिंदुत्व आहे?
विसर्जनाच्या आदल्या दिवशी कशी काय नोटीस बजावता?-उद्धव ठाकरे
पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा हे योग्य आहे मी समजू शकतो. पण शाडूची माती देणार कोण? मूर्ती तयार झाली असेल तर पर्याय काय? विसर्जनाच्या आदल्या दिवशी नोटिसा देणार असाल तर तुमचं हिंदुत्व तरी काय आहे? तलावांमध्ये विसर्जन करायला बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी तर विसर्जन केलेल्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. काही ठिकाणी हे सरकार नतद्रष्टपणे वागलं आहे. मी आज हे सांगतो कुठे कुठे मूर्ती बाहेर काढून ठेवल्या आहेत हे बघा. त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू. प्रवचनं देणं सोपं आहे, पण तू तसा वागतोस का? हे महत्त्वाचं आहे.
रामकृष्ण परमहंस यांचं दिलं उदाहरण
आपल्याकडे म्हटलं जातं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.आपल्याकडे नुसतंच बोलतात आणि कृती काही नाही. रामकृष्ण परमहंस यांना एका साधकाने विचारलं होतं. काही लोक खूप छान बोलतात, एका उंचीवर नेतात पण वागणं भलतंच असतं. मग परमहंस म्हणाले, हे बघ निरभ्र आकाश असतं ना त्यात गिधाडं किंवा घारी उंच उडतात. तरीही इतक्या उंचीवर जाऊन त्यांचं लक्ष जमिनीवरच्या कुजक्या आणि सडलेल्या मांसाकडे असतं तशी काही माणसं असतात. मी हे कुणाला उद्देशून बोललो नाही असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
दप्तरमुक्त विद्यार्थी ही संकल्पना आम्ही राबवली
शाळेमध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणत होते, मुंबई महापालिकेच्या शाळा आपण सुधारल्या की नाही? हे जाऊन तुम्ही बघा. सरकारने ते स्वीकारलं नाही. मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मी २०१४ ला करुन दाखवलं. मी ८ वी, ९ वी आणि १० वीच्या मुलांच्या हाती टॅबच दिला, त्यात पाठ्यपुस्तकं होती. प्रश्नपत्रिका होत्या, ई लर्निंग कोर्स आला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.