आपण लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोक मेले तरीही चालतील तरीही यांना सत्ता हवी आहे. मी परंपरेने दसरा मेळावा घेणार. त्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. ईडी, सीबीआय, यांनी बेजार करायचं, बऱ्याच वर्षांनी नागपूरमध्ये आलो आहे. मीडियाला काम करु द्या. आज शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मला बोलवलं, याचा मला अभिमान वाटतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी भाजपावर टीका केली.

अदाणीला सगळं द्यायचं हे काय चाललंय?

“अदाणीला सगळं द्यायचं हे मुंबईत चाललं आहे असं मला वाटलं होतं पण आज बातमी वाचली की चंद्रपूरची एक शाळा ती पण अदाणींना देऊन टाकली. अदाणी म्हणजे राष्ट्र संत आहेत का? जय देव जय देव जय अदाणी बाबा अशी आरती वगैरे गाणार आहेत की काय? हे सगळे? बाकीचे लोक नाहीत? वन नेशन वन इलेक्शन नाही, वन नेशन वन काँट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे. एकच कंत्राटदार त्यालाच सगळी कामं देत आहेत. आमच्यावर जेव्हा घराणेशाहीची टीका करता तेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुटुंबवत्सल आहेच. त्यामुळेच करोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना आणली होती. कारण मला कुटुंब सांभाळायचं आहे माझ्या समोर माझं कुटुंबच बसलं आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना जबाबदारीने आणली

मी एक घोषणा दिली होती की माझे कुटुंब माझी जबाबदारी कारण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. मधे पेव फुटलं होतं मोदी परिवारचं. ते तर इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांना परिवार आहेच कुठे? छत्रपती शिवरायांना आग्र्याला नजरकैदेत जावं लागलं. त्याचं कारण मिर्झा राजे जयसिंग होते. शिवराय औरंगजेबासमोर झुकले नाहीत आम्ही या अब्दाली समोर झुकणार आहोत का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. अमित शाह मला आणि शरद पवार यांना संपवायला येणार आहे, तुम्ही संपवू देणार का? मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर जनता संपवेल. मला जर दिल्लीहून सांगणार असतील उद्धव घरी बस तर जनता त्यांना घरी बसवेल असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका

“गद्दारांना ५० खोके आणि आम्हाला १५०० रुपये असं महिला सांगतात. २०१४ ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. १५ लाख देणार होते. त्याचे १५०० का झाले? लाडकी बहीण योजनेचे पैसे काय तुमच्या खिशातले नाहीत. जनतेचेच पैसे तुम्ही देत आहात.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला गद्दारांची कमाई नको आहे. मी म्हणजे कुणीतरी आहे असं त्यांना वाटतं आहे. दिल्लीत जाऊन मोदी-शाह यांच्यासमोर कटोरा महाराष्ट्र पसरणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही, गुलाबी जॅकेट म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची जनता माझ्या समोर बसली आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.