शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाड येथे सभा पार पडली. या सभेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शिवबंधन हाती बांधलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
“काहीजणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाही. माझ्यावर टीका करून त्यांना दोन घास मिळत आहेत. पण, स्नेहलताई आणि कुटुंब काँग्रेसमधून शिवसेनेत आलं आहे. त्यामुळे काहींच्या भुवया उंचवल्या आहेत. तर काही जणांच्या पोटात गोळा आला आहे. कारण, पुढच्या निवडणुकीत शंभर नाहीतर एक लाख टक्के डिपॉझिट जप्त होणार आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले यांना लक्ष्य केलं.
हेही वाचा : बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये केली मोठी घोषणा; सरकारला इशारा देत म्हणाले…
तळये गावातील पुनर्वसनावरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार आणि भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मी मुख्यमंत्री असताना तळये गावाच्या पुनर्वसनाचे आदेश दिले होते. पण, अद्याप तेथील १५ लोकांनाच घरे मिळाली, ही माझी माहिती आहे. मात्र, ती चुकीची असेल आणि सगळे त्यांच्या घरी आनंदाने राहत असतील, तर माझ्याएवढा आनंदी कोणी नसेल.”
“पण, मुख्यमंत्री किंवा येथील आमदार तळयेमध्ये जात-येत असेल, नुसता खांद्यावर नॅपकिन टाकून… त्या नॅपकिनचा वापर तुम्ही त्याला करायला लावायचा आहे. त्यांना आता घाम फोडायचा आहे की, नॅपकिन सुद्धा कमी पडला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून मी अयोग्य होतो, तर गद्दारी केली. मग, अजूनही तळये गावातील लोकांना घरे का मिळाली नाहीत,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
हेही वाचा : बारसूमध्ये रिफायनरी का होऊ शकत नाही? युनेस्कोचा दाखला देत राज ठाकरेंनी सांगितलं कारण
“मुख्यमंत्री सुरत, गुवाहाटीला गेले, मग तळीयेला आले होते का? दिल्लीच्या वाऱ्या करत मुजरा करायला जातात,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.