शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यवतमाळमधील दिग्रस येथे सभा झाली. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलेल्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना लक्ष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला एका गोष्टीची लाज वाटते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवीला आलो होतो. लाखो लोक जमले होते. तेव्हा पोहरादेवीचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्यात आला. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो आणि पोहरादेवीच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी दिला. मला वाटलं बांधकामाला वेळ लागेल. पण, येथील रस्तेही निट नाहीत. मग निधी गेला कुठे? का त्यातूनही हफ्ता खाण्यात आला? याची चौकशी कोण करणार?”
हेही वाचा : VIDEO : “मणिपूर शांत करायचे असेल, तर…”, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला
“आमदार आणि खासदार दोघांवर आरोप झाले. आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या. पण, एकदिवशी फोटो आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मात्र, अख्ख्या देशात तुमच्याच पक्षातील काही दलालांनी आरोप होते की, या खासदार भ्रष्ट आहेत. त्यांच्याच हातून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. पुढे चौकशीचं काय झालं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.
हेही वाचा : VIDEO : “…तर राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?” उद्धव ठाकरे यांचा भाजपाला थेट सवाल
“ज्या शिवसैनिकांच्या मागे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स आहे. त्या सर्वांना खासदार आणि आरोप करणाऱ्या दलालांच्या घरी पाठवणार आहे. त्यांना विचारायला सांगणार, तुम्ही आरोप केलेल्यांवर असं काय शिंपडलं? की ते धुवून स्वच्छ झालेत. आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले आहेत,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.