महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण, ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत. काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.
महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे.
“कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
“राज्यपाल म्हणून कोणीही येतात, कोठूनही पाठवले जातात. राज्यपाल आहे म्हणून मान राखला जातो. पण, हेच राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. मुंबई आणि ठाण्याबद्दल केलेलं वक्तव्य महाराष्ट्रातील हिंदूमध्ये फुट पाडण्यासाठी करण्यात आलं होतं. यांना एकूणच महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि महत्व छिन्नविछिन्न करून टाकायचा आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.