पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केला आहे. धारकर आपल्या कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर दाखल झाले. तेव्हा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांनी प्रवेश केला. यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काहीजणांचा आव मोठा होता. पण, डोळे वटारल्यावर पळपुटे पळून गेले. तुम्ही पळपुटे नाही, याचा अभिमान आहे. अन्यायावरती वार करणे, ही शिवसेनेची ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही आणि कुणी अन्याय केला, तर त्याला जागेवर ठेवायचं नाही ही आपली ओळख आहे.”
“कर नाही, त्याला डर कशाला”
“वॉशिंग मशीनमध्ये तुम्हीही जाऊ शकला असता. पण, तुम्ही त्यातले नाही आहात. ‘कर नाही, त्याला डर कशाला.’ वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत आला आहात. सगळे लढवय्ये शिवसैनिक तुमच्याबरोबर आहेत,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिशिर धारकर यांना दिला.
“लोकांना मुर्ख बनवण्याचा उद्योग सुरु”
“पूर्ण चांदा ते बांदा आपल्याला सत्ताबदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपन टिकत नाही, असं म्हणतात. मात्र, शहाणपणांची सत्ता आपल्याला आणायची आहे. लोकांना मुर्ख बनवण्याचा उद्योग सुरु आहे. तो जास्त काळ चालणार नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कोण आहेत शिशिर धारकर?
शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. पेण अर्बन बँक घोटळ्याप्रकरणी शिशिर धारकर आरोपी आहेत. याचप्रकरणात २०१८ साली अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) शिशिर धारकर यांना अटकही केली होती.