अयोध्येत नव्या बांधलेल्या श्री राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये शिवसेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.
गोविंदगिरी महाराज काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरूष आपल्याला ( नरेंद्र मोदी ) मिळाले आहेत. ज्यांना जगदंबा मातेनं हिमालयातून भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलं आहे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन, ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी’, असं केलं होतं. आपल्यालाही श्रीमंतयोगी ( नरेंद्र मोदी ) प्राप्त झाले आहेत,” असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधानांबरोबर केली होती.
हेही वाचा : “नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला, तेव्हा…”, उद्धव ठाकरेंचा सवाल
“अंधभक्तांच्या बुद्धीचा मी आदर करतो, पण…”
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “श्री रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. अंधभक्तांच्या बुद्धीचा मी आदर करतो. पण, कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींबरोबर केली. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींबरोबर होऊ शकत नाही.”
हेही वाचा : “उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही…”, सुरेश भटांच्या ओळी वाचत उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका
“छत्रपतींचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न अनेकवेळा”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही गोविंदगिरी महाराजांच्या विधानावरून टीकास्र डागलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न आजचा नाही. अनेकवेळा हा प्रकार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींची तुलना मोदींबरोबर कधीच होऊ शकत नाही,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.