जळगावातील पाचोऱ्यात रविवारी ( २३ एप्रिल ) उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर.ओ पाटील यांची कन्या, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला होता. आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून टाकणारी लोक आहोत, असं पाटलांनी म्हटलं होतं. याचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.
“काही जणांचा वाटलं तेच म्हणजे शिवसेना आहेत. अरे हट्ट… आम्ही सभेत घुसणार म्हणतात… अशा घुशी खूप पाहिल्यात आम्ही. पण, निवडणुकीत अशा घुशींना बिळातून बाहेर काढत शेपट्या धरून राजकारणात आपटायचं आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटलांवर केला आहे.
“निवडणूक आयुक्तांचा धृतराष्ट्र झालाय”
“पाकिस्तानला विचारलं शिवसेना कोणाची, ते सुद्धा सांगतील. पण, आमच्याकडं मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्तांना दिसलं नाही. त्यांचा धृतराष्ट्र झालाय. मात्र, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे त्यांनी ओळखलं नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं…”
“निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, मरमर राबता आणि हे पिकोजी वरती बसतात. संजय राऊत ‘गुलाबो गँग’ म्हणतात. यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर लाथा सुद्धा लोकांनी खायच्या आणि तुम्ही आरामत बसायचं, हे आता चालणार नाही. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता पुन्हा खाली खेचण्याची वेळ आली आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“भगव्याला कलंक लावणाऱ्यांना धुवायचं आहे”
“निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेत. तो कलंक लावणारे हात राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत,” असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सोडलं आहे.
“अजूनही आम्ही संयम बाळगतोय, म्हणजे नामर्द नाही”
“वाट बघत होतो, घुसणारे कधी घुसणार आहेत. पण, घुसण्याची हिंमत दाखवली नाही. दाखवू शकत नाही. संजय राऊत बोलले होते, ‘तुम्ही घुसाल तर परत जाऊ शकणार नाही.’ अजूनही आम्ही संयम बाळगतोय, म्हणजे नामर्द नाही,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.