शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे. निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवीत. पण, हे ‘मन की बात’ करतात. २०१४ साली दिलेली आश्वासन विचारली की तुरुंगात टाकायचे. जातीय दंगली घडावायच्या, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला तडीपार करा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

हेही वाचा : “सुक्ष्म माणसावर…”, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर मिश्कील टिप्पणी

“मी हिंदुत्व सोडलं, अशी बोंब काहीजण ठोकतात. पण, काय हिंदुत्व सोडलं? मी तर प्रत्येक सभेत विचारतो. एक गोष्ट सांगा मी हिंदुत्व सोडल्याची? हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्या… आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,'” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपाचे हिंदुत्व काय आहे? मेहबूबा मुफ्तींबरोबर गेलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? मोहन भागवत मशिदीत गेल्यावर मी काही बोललो का? मात्र, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपाची भ्रष्टाचार आणि हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. भाजपा आता भ्रष्ट जनता पार्टी झालीय,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा : भरत गोगावलेंना बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी केलं लक्ष्य; म्हणाले, “शंभर नाहीतर…”

“निवडणुका येतील जातील. पण, २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाहीतर लोकशाही संपेल. तुमच्यात हिंमत असेल, तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही, मोदींचे नाव घ्या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attacks pm narendra modi and bjp over bajrang bali ki jai ssa