घराणेशाहीच्या राजकारामुळे देशाचं अरपिमित नुकसान झालं आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( १२ जानेवारी ) केलं होतं. याला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर केली आहे. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कल्याण-डोबिंवलीत असलेल्या गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? गद्दार लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय… हा सगळा बोगसपणा आहे. घराणेशाहीवर एका घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं.”
“अटल सेतूवर वाजपेयींचा फोटो नव्हता”
“पंतप्रधान मोदींनी ‘अटल सेतू’चं लोकार्पण केलं. पण, तिथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो नव्हता. आताही श्री राम मंदिरात रामाची मूर्ती असेल का नाही, याची चिंता आहे. त्यामुळे अयोध्येतील मंदिरात स्वत:ची नव्हे, तर प्रभू श्री रामाची मूर्ती लावा,” असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांनी लगावला आहे.
हेही वाचा : संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांना शूर्पणखेची उपमा; म्हणाले, “२०२४ ला शूर्पणखेचं…”
“झेंडे लावायला अनेकजण येतात, पण”
“अनेक कारसेवकांचं श्री राम मंदिरासाठी मोठं योगदान आहे. कारसेवकांनी धाडस केलं नसतं, तर श्री राम मंदिर झालं नसतं. कारसेवक बाबरीच्या घुमटावरती चढले नसते, तर आताची लोक श्री राम मंदिराच्या शिखरावर झेंडे लावू शकले नसते. झेंडे लावायला अनेकजण येतात. पण, लढण्याची वेळ येते तेव्हा कुठे होतात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
“श्री राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही”
“श्री राम मंदिर निर्माण झाले नव्हते, तेव्हा दोनवेळा अयोध्येला गेलो होतो. श्री राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यात पडल्यानंतर शिवसेनेनं ‘पहले मंदिर फिर सरकार’ ही घोषणा दिली होती. याआधी शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर एक वर्षाच्या आतच न्यायालयानं श्री राम मंदिराप्रकरणी निकाल दिला. त्यामुळे माझ्या मनात प्रेरणा येईल, तेव्हा मी नक्की अयोध्येला जाणार आहे. श्री राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.