भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. भाजपा आणि संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.
“अनेकजण बाळासाहेब ठाकरे आणि माझ्याकडे ‘आम्हाला वाचवा’ असं म्हणत ‘मातोश्री’त आले होते. पण, पुढं जाऊन हे काय करणार? याचा विचार बाळासाहेबांनी केला नव्हता. तेव्हा बाळासाहेब आणि शिवसेनेनं वाचवण्याचं काम केलं. त्याच शिवसेनेला संपवण्याचं काम हे करत आहेत. मात्र, शिवसेनेला संपवून दाखवा,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
“आम्ही कुणाला विरोधक मानत नाही”
“आम्ही लढणारे आहेत. आम्हाला संपवणारेच संपतील. आमच्या मनात कुठलंही पाप नाही. आम्ही कुणाला विरोधक मानत नाही. तेच, आम्हाला विरोधक मानतात. सध्या सत्तेत जाणारे बरेच लोक आहेत. सत्ता सोडून लढाई करणाऱ्यांबरोबर येणं कठीण काम आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“परप्रांतीय आणि मराठी लोकांमध्ये आम्ही कधी भेदभाव केला नाही”
“१९९२-९३ साली शिवसेनेनं मुंबईला वाचवलं होतं. आपत्तीवेळी सगळ्यांची मदत करा, ही शिकवण बाळासाहेबांनी दिली आहे. रक्तदान करताना रक्त कुणाला जाते, हे आपण पाहत नाही. त्यामुळं परप्रांतीय आणि मराठी लोकांमध्ये आम्ही कधी भेदभाव केला नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
ठाकरे गटात कुणी प्रवेश केला ?
- प्रदीप उपाध्याय: भाजप: उत्तर मुंबई जिल्हा सचिव
- घनश्याम दुबे – विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष : भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषद
- रविचंद्र उपाध्याय : विश्व हिंदू परिषद : जिल्हा कोषाध्यक्ष (माजी) उत्तर मुंबई, बोरिवली
- अक्षय कदम – आंतरराष्ट्रीय बजरंग दल, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष
- माधवी शुक्ला – भाजप : जिल्हा महिला उपाध्यक्ष, मिरा – भाईंदर (पूर्व)
- राम उपाध्याय – भाजप: जिल्हा महासचिव, मीरा – भाईंदर
- संजय शुक्ला – अखिल भारतीय ब्राम्हण परिषद : राष्ट्रीय महासचिव
- प्रदीप तिवारी – शिंदे गट जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर
- दीपक दुबे – विश्व हिंदू परिषद : जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली
- दिनेशकुमार यादव – विश्व हिंदू परिषद : तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवली
- सूरज दुबे – बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख