शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या नाही, तर माझ्या वडिलांनी केली. हा सत्तेचा गुलाम झालेला चुना लाव आयोग आहे. भुरटे, गद्दार आणि तोतयांना सांगतोस नाव चोराल, पण शिवसेना चोरू शकत नाही. भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली, त्यांना संपवायला निघाले आहेत. मात्र, त्यांनी प्रयत्न करुन बघावेत, असे आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
खेडमधील गोळीबार मैदानात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांची आपल्यावर वार केले,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
हेही वाचा : “…तुम्ही संगामाचं काय चाटत आहात?,” उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर घणाघात
“यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.