शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. २५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, काँग्रेसबरोबर गेल्यानं शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत बसवून हिंडवण्यासाठी केली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझा जीव देश आणि जनतेसाठी जळत आहे. देशाला जाग करण्याचं काम वंशपरंपरागत माझ्याकडं आलं आहे. मध्ये मुंबईत ‘इंडिया’ची बैठक पार पडली. यांचं अध्यक्षपद शिवसेनेकडं होतं. बैठक पार पडल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावलं. त्यावर ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ असं लिहिलं होतं.”
“२५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केली नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
“वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना स्टेज थोडा हालत होतं. त्या स्टेजसारखंच केंद्र सरकार डगमगत आहे. पडतंय कधी कळत नाही. एवढे घाबरले आहेत की, आधी वाटायचं समोर कुणी आव्हान नाही. मात्र, सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाले आहेत. ‘इंडिया’ नावाची यांना खाज सुटली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.