Uddhav Thackray On Kunal Kamra Controversy over Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कामराने एका स्टँडअप शो दरम्यान गायलेल्या एका गाण्यावरून रविवारी संध्याकाळपासून मोठी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य करणारं एक विनोदी गाणं कुणाल कामराने आपल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गाऊन दाखवलं. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इतकेच नाही तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामराचा शो ज्या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आला त्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी कुणाल कामरा याने काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

कुणाल कामराच्या गाण्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्याने सत्यात्मक गाणं केलं आहे. सत्य आहे त्या जनभावना त्याने मांडल्या आहेत. आम्ही आजही बोलतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की, काल कामराच्या इथे जी तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केली नाही. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ती कदाचीस एशिंशि (एकनाथ शिंदे शिवसेना) गटाने केली असेल, गद्दार सेनेच्या एशिंशि गटाने केलेली असेल. मुळात जे राज्य चाललंय शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललंय की गद्दारांच्या आदर्शाने चाललंय आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे.”

“काल जे भेकड लोकं आहेत, त्यांना त्या गाण्यावरून त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोशारींनी अपमान केला होता तेव्हा कोशारींचा निषेध करण्याचा यांच्यात धाडस नाही. हे भेकड लोकं आहेत आणि गद्दारच आहेत. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं आहे असं माझं मत नाही. कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या आहेत.”

नुकसान भरपाई वसूल करा

नागपूर येथील हिंसाचाराच्या पारश्वभूमीवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात देखील कारवाईची मागणी केली आहे. “मुख्यमंत्री महोदयांना (देवेंद्र फडणवीस) आम्ही सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे, नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात. तसंच कुनाल कामराच्या स्टुडिओची किंवा त्याने जेथे कार्यक्रम केला त्या जागेचं नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे आणि हे जे भामटे, भेकड, गद्दार लोकं आहेत, ज्यांनी ही तोडफोड केली. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला चालतो पण गद्दारांचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडून दाम दुपटीने वसूल करावी,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.