Uddhav Thackeray on Bag Checking : निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यांत जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करत जात आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. काल (११ नोव्हेंबर) त्यांची वणी येथे बॅग तपासल्यानंतर आज औसा येथे त्यांच्या सामानाची तापसणी करण्यात आली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचीच उलटतपासणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे औसा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जाताना उद्धव ठाकरे यांच्या सामानांची झाडाझडती घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचं नाव, त्यांचं नियुक्त पत्रक, एवढंच नव्हे तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा >> Sharad Pawar : “आम्हाला ते सहन करावं लागेल”, वणीमधील ‘त्या’ घटनेवरून शरद पवारांची हतबल प्रतिक्रिया

दरम्यान, आतापर्यंत किती जणांना तपासलं आहे, याबाबत विचारलं असता अधिकाऱ्यांनी तुम्हीच पहिले आहात असं म्हटलं. त्यावर, “मीच पहिला गिऱ्हाईक आहे का?” असा मिश्किल सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मोदींच्या बॅगा तपासण्याचंही आव्हान या अधिकाऱ्यांना दिलं. ते म्हणाले, आज मोदी सोलापुरात येत आहेत. ओदिशात त्यांची बॅग तपासली म्हणून अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं होतं. त्यामुळे माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, ही माझी जाहीरसभेतील आजची मागणी आहे. मला जो न्याय लागतो, तो मोदींनाही लागला पाहिजे.” बॅग तपासत असताना उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले, बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवंतर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन या, असंही ते म्हणाले. तसंच, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना दिलासाही दिला.

जाहीरसभेतही मोदींवर टीका

दरम्यान, जाहीरसभेला संबोधित करतानाही त्यांनी याप्रकरणावरून टीका केली. ते म्हणाले, “माझी फोटोग्राफी बंद झालीय ती परत करायला मिळतेय, यापेक्षा दुसरा आनंद नाही. माझा आक्षेप आहे की मला जो कायदा लावता तो मोदी आणि शाहांना का नाही लावत? ते स्वतःला पंतप्रधान मानत नाहीत. कारण पंतप्रधान, गृहमंत्री पक्षाचा नसतो, देशाचा असतो. शपथेमध्ये लिहिलेलं आहे की मी सर्वांशी सारखा वागेन, उजवं डावं करणार नाही.”

मोदी शाहांची महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा

मला सोलापुरात जायचं होतं, पण त्यांनी माझं विमान थांबवलं. कारण मोदींचं विमान येतंय. म्हणजे तुम्ही मोदींच्या विमानासाठी सर्वं एअरपोर्ट बंद करता, रस्त्यावर नागरिकांना बंद करत आहात. मग हे टिकोजीराव येणार. ही लोकशाही असूच शकत नाही. माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी – शाहांची बॅग तापसलीच पाहिजे. तसंच, माझी जशी येताना बॅग तपासता तशी मोदी शाहांची महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासली पाहिजे. कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चालले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray bag checking at ausa while going to pracharsabha sgk