Uddhav Thackeray on Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा, असेही ते म्हणाले आहेत. राजकीय दबावापोटी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेवर (ठाकरे) जोरदार टिकास्र सोडले आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील तथा शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत असताना त्यांना दिशा सालियन प्रकरण आणि आदित्य ठाकरेंवर केले गेलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दरवेळी अधिवेशन आले की, हा मुद्दा बाहेर काढला जातो. मागच्या दोन-तीन अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही? याचेच मला आश्चर्य वाटले होते. दरवेळी हा मुद्दा काढला जातो, यात नवीन काहीच नाही.
यानंतर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकऱ्याच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे. शेतकऱ्याच्या माता भगिनी टाहो फोडत आहेत. संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणे अनेकांची हत्या झाली. त्यांची मुले न्याय मागत आहेत. त्याबद्दल सरकारची भूमिका काय? दिशा सालियनचे वकील काहीही सांगत असले तरी त्यांनी ते न्यायालयात सांगावे.
खोट्याचा आधार घेत असाल तर…
दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. आमचे घराण्याच्या अनेक पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणाशी दूर दूर पर्यंत संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल तर सर्वांचीच पंचाईत होईल. कारण खोट्याचा आधार घेत असाल तर ते तुमच्यावरही उलटेल.
देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार
नागपूर दंगलीमध्ये ज्या दंगलखोरांनी महिला पोलिसांवर हात टाकला त्यांचे हात उखडून टाका, असे विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेत्यांचे कान टोचत चिथावणीखोर विधाने करू नयेत, अशी ताकीद दिली, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “विरोधी पक्ष संपविण्यासाठी ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला, तेच विष आता भाजपाला मारत आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.