काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटाकडून खेडमधील त्याच मैदानात एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या सभेपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कधीच बाहेर पडले नाहीत. तेव्हा बळीराजा कुठे गेला होता. तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेलेलं? आता उद्धव इथे सभा घ्यायला अफझल खानासारखे अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व लोकांना घेऊन आले. आता त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेतोय. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बळीराजासाठी एकही निर्णय घेतला नाही.”
हे ही वाचा >> “आम्ही १३० ते १४० जागा लढवणार, इतरांच्या शब्दाला काही अर्थ नाही” बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक
शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे यांच्या पोटात पोटशूळ : कदम
कदम म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे बळीराजासाठी निर्णय घेत आहेत. त्यांचं मंत्रिमंडळ राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. पण आता यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. उद्धव ठाकरे यांनी योगश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा विडा उचलला होता. यापूर्वी मला संपवण्यासाठी संजय कदम यांना तीन वेळा मातोश्रीवर बोलावण्यात आलं होते. मात्र, माझ्या दबावामुळे त्यांना ते शक्य झालं नाही.”
रामदास कदम म्हणाले की, “ही सभा (खेड) आम्ही आयोजित केली आहे कारण उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कोकण त्यांच्यासोबत आहे. कोकण त्यांच्यासोबत नाही, कोकण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, हे सांगण्यासाठी, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. ही एक ऐतिहासिक सभा होईल.” तसेच कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. कदम म्हणाले की, “महाराष्ट्राची जनता आता संजय राऊतांना कंटाळली आहे. रोज तेच-तेच ऐकून कंटाळली आहे.”