केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलीय. तसंच, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण आणि नाव मिळू शकतं का असा प्रश्न वकिल सिद्धार्थ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, आमदार आणि खासदार संख्येच्या बळावर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मागच्या वर्षी फेब्रुवारीत दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली नाही. परंतु, पुढील आदेश येईपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव आणि मशाल पक्षचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले. परंतु, आता त्याला एक वर्ष झाले आहे.

हेही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाकडून शरद पवार गटाला अंतरिम दिलासा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागण्याची शक्यता

शिवसेना पक्षासंदर्भात आता फक्त युक्तीवाद राहिला आहे. १ मार्चला युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर एक-दोन तारखा दिल्या जातील. या तारखांना युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची केस स्ट्राँग आहे, असं वकिलांचंही म्हणणं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळू शकेल. लोकसभा निवडणुकीआधी हा निकाल येऊ शकत नाही, पण विधानसभेच्या आत येण्याची शक्यता आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरेंचे युक्तीवाद स्ट्राँग

“सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आहे. ते नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. निवृत्तीआधी त्यांना त्यांच्यासमोरील प्रकरणे संपवायची असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह आणि पक्षनाव पुन्हा मिळण्याची संधी आहे. कदाचित उलटाही निर्णय येऊ शकतो. पण ठाकरेंचे युक्तीवाद स्ट्राँग आहेत. त्यामुळे त्यांना ते मिळू शकतं. पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर राज्यात राजकीय गणित काय असतील हे मी सांगू शकत नाही”, असंही सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray can get back shiv sena party and bow and arrow symbol sc lawyers explained sgk