Uddhav Thackeray On Jay Shah : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. राज्यातील विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमधील लोहा-कंधारमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी अमित शाह यांना काही सवाल विचारत जय शाह यांना खुलं आव्हान दिलं. “जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगले क्रिकेट खेळतात. जय शाहांनी गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठल्याही क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद द्यायचं ते द्यावं”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“अमित शाह यांनी मुद्याचं बोलावं. तुम्ही गेल्या १० वर्षात थापांशिवाय काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी काल धुळे जिल्ह्यात आले होते. चांगली सुरुवात केली, कारण यावेळी जनता त्यांना धूळच चारणार आहे, म्हणून त्यांनी धुळ्यातून सुरुवात केली. मोदींनी आपल्यावर टीका केली, म्हणाले की महाविकास आघाडीच्या गाडीला चाकं आणि ब्रेकही नाही. त्यांनी आमच्याकडे काय आहे आणि काय नाही? हे सोडून द्यावं. आमच्याकडे काय आहे हे जनता ठरवेल. ही जनता हे आमचं सर्व काही आहे. पण मोदींच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत ती चाकं एकदा पाहावी. एकीकडे अजित पवार बसलेत. आणखी कोणकोण घेतलेत? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सर्व त्यांच्याकडे आहेत”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.

हेही वाचा : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”

“प्रफुल पटेल यांना भाजपाबरोबर घेतलं. मग ते तुमच्याकडे आल्यानंतर मिरची गोड कशी झाली? आमच्याकडे होते तेव्हा त्यांना मिरचीचा ठसका लागत होता. प्रफुल पटेल भाजपाबरोबर गेले आणि त्यांना मिरची गोड झाली. मग तुमच्याकडे आल्यानंतर सर्व साधू संत झाले का? आता ते विकास मी थांबवला अशी टीका माझ्यावर करतात. यावरून अमित शाह यांना मी प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते लोकसभेच्या प्रचारात बोलत होते की, मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचंय. मग आता तुम्ही ज्यांना मानता त्यांच्या डोक्यावर हाथ ठेवून सांगता का? की तुम्हाला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही म्हणून. हे ही शपथ घेऊन सांगा की कोणी कितीही जबरदस्ती केली तरी तुम्ही पंतप्रधान होणार नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

“आधी जय शाह यांना क्रिकेटच्या बोर्डावरून खाली उतरवा. जय शाह यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे का? सर्वात जास्त विकेट जय शाह यांनी काढल्या आहेत का? जय शाह यांचं कर्तृत्व काय? त्यांच्यापेक्षा आमच्या गावाकडचा एखादा मुलगा जास्त चांगलं क्रिकेट खेळतो. माझं आव्हान आहे जय शाह यांनी इकडे लोहा-कंधारला यावं आणि कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं. आहेत का ते तयार? माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, विराट कोहली वैगेरे नाही तर कोणत्याही गावातील एखाद्या तरुणाबरोबर जय शाहांनी क्रिकेट खेळून दाखवावं. मग मी मानेन की केवळ भारताचंच नाही जगाचंच नाही तर आणखी पृथ्वीशिवाय गुरु, शुक्र आणखी कुठे क्रिकेट क्लब असतील तर त्या सर्वांचा अध्यक्ष जय शाह यांना करा”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray challenges to jay shah and amit shah in loha assembly politics maharashtra vidhan sabha election 2024 gkt