सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना राज्यपालांपासून विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, असं निरीक्षण नोंदवलं. यावर आता शिवसेना( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१२ मे) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निकालात असं निरीक्षण नोंदवलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ आत्ताचं अस्तित्वात असलेलं शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे. मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला. याचं कारण मी सांगितलं आहे.”
व्हिडीओ पाहा :
“…म्हणूनच मी राजीनामा दिला”
“ज्या लोकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी सर्वकाही भरभरून दिलं, आपलं मानलं, विश्वास दाखवला त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला कदापि चाललं नसतं. अशा विश्वासघातक्यांचं प्रमाणपत्र घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यात काडीचाही रस नव्हता. म्हणून आणि म्हणूनच मी राजीनामा दिला. त्यावर मी समाधानी आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.