येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीत आहेत, त्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. सरकारच्या याच आदेशावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपा सरकारवर टीका केली आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. उद्या पाकिस्तानमध्ये निवडणुका असतील तर पूर्ण देशाला सुट्टी जाहीर करणार का? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
हेही वाचा >> फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…”
“हे महाराष्ट्राचे सरकार आहे की गुजरातचे हे मला समजत नाहीये. येथे बऱ्याच वर्षांपासून गुजराती लोक राहतात. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक असते तेव्हा कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सुट्टी असते का? हा काय नवीन प्रकार आहे. उद्या पाकिस्तानच्या निडणुकीसाठी पूर्ण देशात सुट्टी जाहीर करतील,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >> सीमाप्रश्नावरून संजय राऊतांची शिंदे गटावर टीका, दादा भुसेंचेही जशास तसे उत्तर; म्हणाले “आम्ही काल जे होतो…”
‘जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी ठराव केला आहे. या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत,’ असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत. बोम्मई यांच्या याच विधानाचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला १०० गावं देऊ’ असंही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.