ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वज्रमूठ’ सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं. मला काँग्रेसने ९१ वेळा शिव्या दिल्या, या विधानावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
९१ वेळा दिलेल्या शिव्या मोजणारी ही किती सभ्य माणसं आहेत, असा उपरोधिक टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. “मला मोदींना सांगायचं आहे, मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही, शिव्या देता येतात. पण तुम्हाला जेव्हा वाटतं की काँग्रेस तुम्हाला शिव्या देतंय, तेव्हा तुमची भोकं पडलेली टिनपाट लोक मला, आदित्यला आणि माझ्या कुटुंबियांना दररोज बोलतात, तेव्हा तुमचं तोंड गप्प का आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
“ते माझ्यावर ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत माझा शिवसैनिक अजून बोललेला नाही. संजय राऊतही त्या भाषेत बोलत नाहीत. आम्ही तुमचा मान ठेवतो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही त्या टिनपटांना जी भोकं पडली आहेत, त्यांना बुच घाला, म्हणजे सगळं चांगलं होईल. तुमची लोक वाट्टेल ते बोलणार… हे ऐकून घेणार नाही. तुमची लोक बोलल्यावर आमची लोकही बोलणार म्हणजे बोलणारच… तुमची लोक आम्हाला रोज बोलतात, ते ऐकायला आमच्या कानाला देवानं केवळ भोकं दिली नाहीत, तोंडालाही भोक दिलं आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- “दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे”, वज्रमूठ सभेत अजित पवारांसमोर संजय राऊतांचं विधान
नरेंद्र मोदींना उद्देशून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मोदींची माणसं आम्हाला कोणत्या भाषेत बोलतात? हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हीच शिकवण तुम्ही तुमच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दिली आहे का? रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेबद्दल मला आदर होता. प्रमोद महाजन आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासारखी लोक या संस्थेचं काम बघायचे. काही वेळा मीही तिकडे गेलो आहे. तिकडे चिंतनं व्हायची. अजून काही काही व्हायचं. मग तुम्हाला रामभाऊ म्हाळगींनी ही भाषा शिकवली का? मग ते सगळे संस्कार कुठे गेले? ती संस्कारी माणसं कुठे गेली? म्हणून मी पुन्हा-पुन्हा विचारतोय, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतोय, हे असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का?”