निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. कारमध्ये उभे राहून साधलेल्या या संवादात त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. मर्द असाल तर चोरलेला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल घेऊन येतो. कोण जिंकतो ते बघुया, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो

“ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी…

“मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,” असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticize eknath shinde and rebel shiv sena mla after election commission decision prd
Show comments