देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे दुबळी माझी झोळी म्हणावा असाच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना छप्परफाड घोषणा केल्या. मात्र महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर येऊ न देता स्वप्नाळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. सत्तेसाठी खोक्यांचा वापर करायचा आणि शेतकरी तसंच जनतेसाठी निवडणुकीच्या वर्षात घोषणांचा सुकाळ करत स्वप्ने दाखवायची हेच धोरण अर्थसंकल्पात समोर आलं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर सामनातून टीका करण्यात आली आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
पुढच्या वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी अर्थसंकल्प सादर केला. या भाषात त्यांनी अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पाडला. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या बहुतांश भागाला गारपीट आणि अवकाळी पाऊस यांनी झोडपलं. शेतकऱ्याला जो अवकाळी पावसाचा फटका बसला त्यापेक्षा फडणवीस यांच्या भाषणातला जोर अधिक होता. शेतातील काढणीला आलेली उभी पिकं उद्ध्वस्त झाली. मात्र त्या नुकसानालाही लाजवेल अशा शब्दांचा आणि घोषणांचा पेटारा फडणवीस यांनी फोडला.
घोषणांचा पाऊस बाकी काहीच नाही
शेतकरी, महिला, वेगवेगळे जातीसमूह, समाजासाठी नवनवीन महामंडळे, रस्ते, रेल्वे , विमानतळ, मेट्रोंच्या निधीसाठीच्या घोषणा असं मतदारांना आकर्षित करणारं अर्थसंकल्पात सगळं काही होतं. मात्र राज्याची आर्थिक स्थिती काय आहे देवेंद्र फडणवीस यांनी बहुदा लक्षात घेतलेलं नाही. कारण अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जो आर्थिक पाहणी अहवाल समोर आला त्यातून महाराष्ट्राची आर्थिक पिछेहाट जनतेसमोर आली. त्याचा मागमूसही देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात दिसला नाही.
सात लाख कोटींचे कर्ज आणि त्याच्या व्याजात जाणारा पैसा याची तोंडमिळवणी याविषयीचे नेमके चित्र महाराष्ट्रासमोर न मांडता घोषणांचा गडगडाट तेवढा उपमुख्यमंत्र्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातील घोषणा आणि हजारो कोटींच्या तरतुदी ऐकून घेशील किती दोन्ही करांनी असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर आली आहे. अर्थसंकल्पातून नुसताच गाजर हलवा देऊन सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी या व्यंकटेश माडगुळकरांच्या ओळीच आज आठवत आहेत असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोमणेही मारले आहेत.