उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार मेळाव्यातून मुंबई आपल्याला जिंकायचीच आहे म्हणत महापालिका निवडणुकीचं रणशिंगच फुंकलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसंच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेचं नाव शिवसेना अमित शाह असं ठेवावं असाही टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत. मोहन भागवतच कुंभमेळ्यात गेले नाहीत तर आम्ही कसे जाणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, ‘छावा’ चित्रपट आला. त्यामध्ये भाजपाच्या लोकांचं कर्तृत्व काय? तुमचा काय संबंध? तरीही त्याबद्दल बोलत आहेत. माझं भाजपावाल्यांना सांगणं आहे की अनाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला हे बघायचं असेल तर जरुर जा.

संघाचे लोक गच्चीमधून देशप्रेम शिकवणारे…

स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रं आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपला लगावला. दैवतांवरून भांडण लावणारे आता भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाषण करत मुंबई आपल्याला जिंकायची आहे असा निर्धार तुम्ही सगळ्यांनी करा असंही आवाहन केलं.

भय्याजी जोशींच्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

संघाच्या भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. ते म्हणाले की, “गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही. पण हे लोक आता भाषिक प्रांतवाद सुरू करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत बरं हे काही माझं सांगणं नाही. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच हे सांगितलं होतं. आता हे जोशी घाटकोपरची भाषा गुजराती म्हणतात. आम्हाला शिकवू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही यांनी फूट पाडण्याचंच काम केलं.” असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून समाचार

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या निर्धार शिबीरादरम्यान आज भाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती दिल्याच्या मु्द्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही असंं उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीस तुम्ही ‘उद्धव ठाकरे’ होऊच शकत नाही

“करोना काळात मी काम बंद पडू दिलं नव्हतं. मेट्रोची कामे मी बंद पडू दिली नव्हती. कोस्टल रोडचं काम बंद पडू दिलं नव्हतं. रुग्णालयात देखील ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सेवा सुविधा आम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्या होत्या. फक्त तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून ‘मी उद्धव ठाकरे नाही’ म्हणालात ना, तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाहीत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.