आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. ही निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतायत. उद्धव ठाकरे यांनीदेखील एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपावर सडकून टीका केली. भाजपा आणि आमचं हिंदुत्त्व वेगळं आहे. भाजपा ४०० जागा कशी जिंकते तेच मी पाहतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“अबकी बार भाजपा तडीपार करुया”
“याआधीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या युतीने ४२ खासदार निवडून दिले नसते, तर भाजपाला दिल्लीचं तख्त राखता आलं नसतं. आता दिल्लीचं तख्त पहिल्यांदा फोडावं लागेल आणि तिथे आपलं तख्त बसवावं लागेल. अबकी बार ते ४०० पार असं सांगतायत. मी तर म्हणतो की अबकी बार भाजपा तडीपार करुया. तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा कसे जिंकतात तेच मी पाहतो,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.
“अरे गेल्या वेळेला महाराष्ट्राने…”
भाजपाने आमचा विश्वासघात केला, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला. “अरे गेल्या वेळेला महाराष्ट्राने ४० ते ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपाला २५० पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नसत्या. भाजपाने दोन वेळा आमचा विश्वासघात केला,” असं ठाकरे म्हणाले.
“भाजपाचं आणि आमचं हिंदुत्त्व खूप वेगळं”
“आम्हाला भाजपाचं हिंदुत्त्व मान्य नाही. आमचं हिंदुत्त्व वेगळं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. “आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत होतो. मात्र भाजपाचं आणि आमचं हिंदुत्त्व खूप वेगळं आहे. मला भाजपाचं हिंदुत्त्व मान्य नाही. आज समाजवादी विचारांचे सगळे लोक माझ्यासोबत आले आहेत. मुस्लीम लोकही आज माझ्यासोबत आहेत. कारण आमचं हिंदुत्त्व हे घरातली चूल पेटवणारं आहे. भाजपाचं हिंदुत्त्व हे घर पटेवणारं आहे. आमचं हिंदुत्त्व हे संत गाडगेबाबा यांचं हिंदुत्त्व आहे. जो तहाणलेला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, ज्याला घर नाही त्याला घर देणं हे आमचं हिंदुत्त्व आहे,” असं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.