हिंगोली : आता ‘फडतूस’ म्हणणार नाही. ‘कलंक’ असेही म्हणणार नाही. ‘थापाडय़ा’ म्हणणार होतो, पण तेही मी म्हणणार नाही, असे ‘म्हणणार नाही’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली. निवडणुकीच्या काळात येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रयान पाठविल्याचे श्रेय घेत चंद्रावर घरे देऊ, असेही आश्वासन देऊ शकतात, तेव्हा सावध राहा. पुढील लढाई ही लोकशाहीविरोधी आणि लोकशाहीच्या बाजूची आहे. त्यामुळे ‘इंडिया’ला नावे ठेवणाऱ्यांना आम्ही ‘घमेंडिया’ असेही म्हणू शकतो, असे ठाकरे म्हणाले.

हिंगोली येथे रामलीला मैदानात जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका तर केली, पण शब्दांत मात्र अडकायचे नाही, असे त्याचे स्वरूप होते. आपल्या भाषणाला तिरकसपणाची धार देत ठाकरे म्हणाले, ‘मला आता भाजप कार्यकर्त्यांची दया येते. त्यांना केवळ वापरून घेतले जाते. आयुष्याची अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना फक्त सतरंज्या उचलायला ठेवले आहे. उपरे येतात आणि मोठे होतात. एके काळी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर काम केले असल्याने त्यांची दया येते. एका बाजूला दुष्काळ असताना उपमुख्यमंत्री जपानला उद्योग आणण्यासाठी जातात. तेथे त्यांना ‘डॉक्टरेट’ मिळते. चांगले आहे. अन्य देशातून गुंतवणूक वाढविण्यासाठी जात आहात ते चांगले आहे; पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प गुजरातला गेले ते परत आणणार आहात का? जपानपेक्षा गुजरात जवळ आहे. टीका केली की झोंबते. त्यामुळे मी आता फडतूस, कलंक असे म्हणणार नाही, थापाडय़ाही म्हणणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. येत्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यामुळे आपल्या घरात कोणत्या योजना मिळाल्या, हे आधी घरात विचारावे.

हेही वाचा >>>अंबानी यांनी भाडेतत्त्वावरील विमानतळांची वाट लावली! अजित पवारांची टीका

शिवसैनिकांनीही त्यांना ‘होऊ द्या चर्चा’ या नव्या राजकीय उपक्रमातून हे प्रश्न विचारावेत, असे आवाहन ठाकरे यांनी केले. राम मंदिराचा सोहळा साजरा करून परतताना काही मुस्लीम वस्त्यांमध्ये तरुणांना घुसवून दंगली घडविण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, या माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि खासदार मोईआ मोईत्रा यांच्या आरोपाकडेही गंभीरपणे पाहायला हवे. हे आरोप माझे नाहीत, असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. या सभेत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या आशीर्वादाने मटका, गुटखा आणि दारू सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार सुभाष साबणे, जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख यांचीही भाषणे झाली. सभेपूर्वी पाऊस होऊनही सभेस मोठी गर्दी होती.

हेही वाचा >>>तेलगी प्रकरण अन् गृहमंत्रीपदाचा राजीनामा, छगन भुजबळ शरद पवारांवर बरसले; म्हणाले…

‘बिल्कीस बानोकडून राखी बांधून घ्या!’

या वर्षीचे रक्षाबंधन भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लीम महिलांकडून राखी बांधून करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हेच मी म्हणालो असतो तर उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले, हे मोठय़ा आवाजात सांगितले गेले असते; पण जर राखी पौर्णिमा करायची असेल तर ‘बिल्कीस बानो’कडून पंतप्रधानांनी राखी बांधून घ्यावी, असेही म्हणत त्यांनी टीका केली.

Story img Loader