विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने आले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भात आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अंबादास दानवे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही षडयंत्र रचून करण्यात आलेली कारवाई आहे”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. “अंबादास दानवे यांच्या विधानाबद्दल मी पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अपमान झाला असल्यासं माफी मागायला तयार आहे. मी माफी मागतोही. पण काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी जे विधान केलं होतं. त्याबद्दल कोण माफी मागणार?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आता लढाईला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या ज्या ११ जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडून प्रज्ञा सातव शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आम्ही सर्वांनी मिळून शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिली. आम्ही तीनही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष हे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : मोठी बातमी! अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन; विधानपरिषदेत ठराव संमत

अंबादास दानवेंवरील कारवाईवर ठाकरे काय म्हणाले?

“आता देशात आणि राज्यात जे काही चाललं आहे, आपल्याला माहिती आहे की विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज असते. त्यावर विरोधी पक्षाची भूमिका मांडू देणं गरजेचं असतं. त्यानंतर निर्णय देत असतात. मात्र, एकतर्फी निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. खरं तर अंबादास दानवे यांनाही त्यांची बाजू मांडू देण्याची आवश्यकता होती. विरोधी पक्षाकडून कोणालाही बाजू मांडू देण्यात आली नाही. जणूकाही हे सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर केला.

“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे निलंबित केलं गेलं असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमचा जो काही विजय झालेला, तो विजय झाकून टाकण्यासाठी, त्याच्या बातम्या मागे पडण्यासाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असावी”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

…तर मी माफी मागतो

“अंबादास दानवे यांच्या विधानाबद्दल मी पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागायला तयार आहे. मी माफी मागतोही. कारण आम्हाला त्यांच्याबद्दर आदर आहे. मात्र, लोकसभा प्रचाराच्यादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण-भावांच्या नात्याबद्दल जे विधान केलं होतं. त्याबद्दल कोण माफी मागणार आहे? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत विधान केलं होतं. मग हा माता भगिनींचा अपमान नाही का? मग मी जर यावर माफी मागतो आहे. मग सभागृहात बोललं तर अपमान आणि जाहीरपणे बोललं तर अपमान नाही का? हे कुठलं गणित? सुधीर मुनगंटीवार यांना तर जनतेनं निलंबित केलं आहे, आता विधानसभेलाही निलंबित करतील”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes bjp over suspension of shivsena ambadas danve gkt