राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यापाल कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांना लवकर शहाणपण सुचलं. आगामी काळात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्यास त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कोश्यारी यांना इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र; बाळासाहेबांचा संदर्भ देत म्हणाले, “बंडखोरी केलेले ४० दगड …”
“महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातमध्ये पळवले. आर्थिक केंद्र गुजरातमध्ये घेऊन गेले. फिल्मसिटी उत्तर प्रदेशमध्ये न्यायला आले. मध्येच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. आपले मुख्यमंत्री दावोसमध्ये जाऊन भाकरवडी करण्याचा उद्योग महाराष्ट्रात आणत आहेत,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >>> “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही,” संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले, “त्यांना गल्लीत…”
“भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना फार लवकर शहाणपण सुचलं. त्यांना खरंतर हाकलून द्यायला हवे होते. हा माणूस महाराष्ट्र द्वेष्टा आहे. विधानभवनात गेल्यानंतर आपल्याकडच्या महापुरूषांचे फोटो आहेत. त्यांचा अपमान राज्यपाल करतात. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे तेथे अनावरण होत आहे. असे असताना ते घरी जाण्याची परवानगी मागत आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”
“यापुढे असे विधान केले तर सोडायचे नाही. अजिबात सोडायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही शांत बसणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन तिकडे कानडी भाषेत बोलतात. अशा उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला शिवसैनिक बसू शकत नाही. ही नाटकं आता बंद झाली पाहिजेत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.