Uddhav Thackeray On Maharashtra Budget: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य, कृषी आणि समाजकल्याण क्षेत्रातही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३६,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी आज दुपारी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीचा जाहीरानामा दाखवत जनतेला दिलेल्या आश्वसणांची आठवण करुन दिली.

मारल्या होत्या थापा भारी…

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासह इतर अनेक मुंद्द्याबात त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, “आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते, गेल्या १० हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणूक काळात वारेमाप जाहीराती केल्या होत्या. थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले का?

“निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या. जाहिरातीत अनेक गोष्टी सांगितल्या आणि सरकार निवडून आणले, मते मिळवली. त्यातील ईव्हीएम घोटाळा हा भाग वेगळा आहे. पण प्रचंड बहुमताच्या या सरकारने थापांमधून एकतरी आश्वासन पूर्ण केले का? लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त मुंबईत त्यांचेही स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह पुढील दहा वर्षांत पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.