पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवारी रविंद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. आता या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“उद्या १ मे आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करण्यासाठी मी हुतात्मा स्मारकावर जाणार आहे. पण आपल्याला फक्त अभिवादन करुन चालणार नाही तर आजच्या या सभेत आपल्याला एक शपथ घ्यावी लागणार आहे. आपल्या महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. महाराष्ट्रात हुकुमशाहा फिरत आहे, काही झाले तरी हा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात जावू देणार नाही, अशी मी शपथ देतो”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा : “मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

“नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. मात्र, आम्ही ज्यावेळी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी त्यांना कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाहीत. आता त्यांच्या बरोबर जे आहेत ते ओझे वाहणारे गाढवं आहेत. मला आता त्यांची किव येते. कारण त्यांना महाराष्ट्रात कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाही तेवढ्या सभा आता घ्याव्या लागत आहेत”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

“१० वर्ष झाले आहेत, ते पंतप्रधान होते. मात्र, अजूनही ते काँग्रेसच्या नावाने ओरडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला महागाईचे चिमटे काढत आहेत. पण ते चिमटे त्यांनी स्वत:ला काढून पाहावे. कारण तुम्ही खरंच पंतप्रधान होतात. मात्र, आता तुमची खुर्ची जाणार आहे. एवढ्या खालच्या पातळीवर टीका करता. शरद पवार यांना ते काय म्हणाले? भटकती आत्मा. आता जशी भटकती आत्मा असती तशी ओकओकलेला आत्माही असतो”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा

भाजपाने ४०० पारचा नारा दिलेला आहे. यावर भाजापाला संविधान बदलायचे आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून विरोधक करत आहेत. यावरुनच आता उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भाजपावाल्यांनो याद राखा, तुम्हाला आज जाहीर इशारा देत आहे. तुम्ही परत सत्तेवर येणार नाहीच. पण घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes prime minister narendra modi in pune and slams bjp over constitution change marathi news gkt
Show comments