राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करत काही मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर हल्लबोल केला. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला. मुंबईतील प्रश्नावरून आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ‘मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आशिष शेलार यांच्यावर केली.

हेही वाचा : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आरक्षणाच्या मुद्यांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व समाजाला न्याय हक्क पाहिजे, न्याय हक्काची मागणी करणं हा गुन्हा नाही. पण आरक्षणाचा न्याय हक्क मिळण्यासाठी कायद्याने काही मर्यादा आखलेल्या आहेत आणि आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर ते फक्त लोकसभेत होऊ शकतं. आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार पाडून अडीच वर्ष झाले आहेत. मग या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने यावर तोडगा का काढला नाही?”, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “अनिल देशमुख यांनीही त्यांच्यावर आणलेल्या दबावाबाबत काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर ते मला भेटले तेव्हाही मला त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या सत्तेत बसलेले जे लोक आहेत ते सर्व अमानुष आहेत. हे कुटुंब पाहत नाहीत. मुलांबाळांवर घाणेरडे आरोप करतात. उद्या त्यांच्या मुलांवर कोणी अशा प्रकारचे आरोप केले आणि एखाद्या प्रकरणात कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा यांना कळेल की आई वडिलांचं दु:ख काय असतं. मी सांगतो की आधीचा भारतीय जनता पक्ष वेगळा होता. पण आत्ताचा जो भारतीय जनता पक्ष आहे, तो घृणास्पद काम करणारा पक्ष आहे. ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे”, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, याचवेळी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता “मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आशिष शेलार यांच्यावर केली.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं विधान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आशिष शेलार यांना डिवचण्यात येत आहे. आताही उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता टीका केली.