शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवरील मेळावा कचरा मेळावा असल्याचा घणाघात जाधवांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचा तुम्ही विश्वासघात केलात. ५० खोक्यांमधील अर्धे खोके खाली करणार आणि या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
शिवसेनेशी बंडखोरी केलेले नेते धनुष्यबाणावर निवडून आले. आता तेच धनुष्यबाण गोठवण्याची हे नेते भाषा करतात, अशी टीका जाधव यांनी एकनाथ शिंदेंवर केली. “काँग्रेसची सत्ता असतानाही शिवतीर्थ दसरा मेळाव्यासाठी नाकारण्यात आले नाही. त्यांनीही दसरा मेळाव्याच्या परंपरेचा आदर केला. ज्या मैदानातून देशाला हिंदूत्वाची दिक्षा मिळाली, तेच मैदान शिवसेनेला मिळू नये हे पातक करण्याचे काम गद्दारांनी केले”, असा हल्लाबोल जाधवांनी शिंदे गटावर केला.
दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही, असे ठाकरे यांनी शिंदे गटाला सुनावले आहे. “आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची” असे म्हणत ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. नेत्यांनी कायदा पाळून भाषणं करावीत, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला.