Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Marathi News: राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यामुळे वाचावरण तापल्याचं पाहायला मिळत होतं. मुंबईत आज दोन्ही गटांचे मेळावे पार पडले. ठाकरे गटाच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंच्या गटावर परखड शब्दांत हल्लाबोल करण्यात आला. तर त्याच वेळी शिंदे गटाच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या मेळाव्यातून ठाकरे गटाच्या नेतेमंडळींवर व खुद्द उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडण्यात आलं. शिवाजी पार्कवर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी थेट मोदींना लक्ष्य करताना घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही हल्लाबोल केला.
सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने विरोधकांवर घराणेशाहीच्या मुद्द्यावर टीका केली जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घराणेशाहीची टीका केली होती. त्यामुळे या आरोपांवरून प्रतिक्रिया उमटत असताना आज मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी मोदींच्या त्याच टीकेचा समाचार घेताना भारतीय जनता पक्षावर टीकास्र सोडलं.
काय म्हणाले भास्कर जाधव?
“पंतप्रधान कायम घराणेशाही घराणेशाही म्हणत असतात. पण सोनिया गांधींच्या जाऊबाई मेनका गांधी, वरुण गांधी हे भाजपाच्या सरकारमध्ये आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर पंतप्रधान मोदी बोलत होते. माझा मोदींना प्रश्न आहे की अमित शाह, जय शाह कोण आहेत? वसुंधरा राजे व दुष्यंत सिंह कोण आहेत? नारायण राणे आणि त्यांचे चंगू-मंगू कोण आहेत? विजयकुमार गावित आणि हिना गावित कोण आहेत? गोपीनाथ मुंडे-पंकजा मुंडे-प्रीतम मुंडे कोण आहेत? प्रमोद महाजन-पूनम महाजन कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील-सुजय विखे पाटील कोण आहेत?” अशी भाजपामधील कुटुंबांची यादीच भास्कर जाधव यांनी वाचून दाखवली.
“सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळी कानफाट फोडतंय, पण…”, राहुल नार्वेकरांना सुनावत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल…
देवेंद्र फडणवीसांना सवाल
दरम्यान, याच यादीत भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला. “मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की तुमचे वडीलही दोन वेळा आमदार होते. देवेंद्र फडणवीस व गंगाधर फडणवीस ही घराणेशाही नाही काय? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हीदेखील घराणेशाही नाही का? तुमच्या बाजूला असणारा सोज्वळ आणि पलीकडच्यांवर टीका-टिप्पणी करायची असा हा प्रकार आहे”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
मोदींची केली नक्कल!
यावेळी भास्कर जाधव यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “२०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना भाषणाला यायचे तेव्हा स्टेजवर एखाद्या हिरोसारखे यायचे आणि डाव्या हाताने लोकांना अभिवादन करायचे. इथे आल्यानंतर त्यांची सुरुवात व्हायची…’अच्छे दिsssन.. ‘ की लगेच झालं. समोरून लोक म्हणायचे ‘आयेंगे’. १५ लाखांपासून यांनी सगळी आश्वासनं दिली. अशी आश्वासनं देऊन २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकली”, असं भास्कर जाधव म्हणाले.