पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल समोर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगणार आहे. या आघाडी आणि युतीमध्ये देशातील सर्व स्थानिक आणि राज्यपातळीवरचे पक्ष सामील झाले आहेत. त्यामुळे दोन्हींकडेही जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीतही अशीच समस्या निर्माण झाल्याने जागा वाटपाबाबत रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, इंडिया आघाडी अंतर्गत महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. परंतु, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाने महाविकास आघाडीत ४८ पैकी २३ जागांसाठी प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. परंतु, हा प्रस्ताव काँग्रेसला अमान्य असल्याचंही नुकतंच समोर आलं होतं. यावरून संजय निरुपम यांनी आज (२८ डिसेंबर) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. संजय निरुपम म्हणाले, माझं असं म्हणणं आहे की जागा वाटप हा फार क्लिष्ट विषय असतो. सहजरित्या जागा वाटपाचा निर्णय होणार नाही. इंडिया आघाडीला एकत्र येऊन भाजपाविरोधात लढायचं असेल तर आपण एकमेकांविरोधात लढणं बंद केलं पाहिजे.

हेही वाचा >> मोठी बातमी! ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली, लोकसभेसाठी जागा वाटपाचा तिढा वाढणार?

सामनातून बोलण्यापेक्षा….

शिवसेनेने वृत्तपत्रांच्या माध्यमांतून २३ जागांची मागणी केली आहे. २३ जागा खूप जास्त आहेत. ४८ पैकी २३ जागा तुम्हाला दिल्या तर आम्ही कुठून लढणार? सार्वजनिक ठिकाणी किंवा वर्तमानपत्रांतून जागा वाटपाची मागणी करण्यापेक्षा इंडिया आघाडीच्या बैठकीत असा प्रस्ताव ठेवायला हवा. सामनातून मागणी करण्यापेक्षा बैठकीत म्हणणं मांडा”, असा खोचक सल्लाही संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला दिला.

काँग्रेसची व्होटबँक फिक्स

“गेल्या एक दीड वर्षांत शिवसेना (ठाकरे गट) पूर्णपणे विखुरली आहे. शिवसेनेतील मोठे नेते सोडून गेले, आमदार सोडून गेले. १८ खासदारांपैकी अनेक खासदार सोडून गेले आहेत. राष्ट्रवादीतही तसंच घडलं आहे. या दुर्दैवी घटना आहेत. परंतु, हेच सत्य आहे. राष्ट्रवादी विखुरली. शिवसेनेची सध्याचा व्होट बँक किती आहे हे माहितीच नाही. राष्ट्रवादीकडे शरद पवारांचे किती फॉलोवर्स आहेत हेही माहित नाही. या सर्व प्रकरणात काँग्रेसचं व्होटबँक फिक्स आहे. आमच्याकडे मतेही आहेत, नेतेही आहेत आणि कार्यकर्तेही आहेत. पक्ष विखुरलेला नाहीय. तर अशात काँग्रेसला कमी लेखण्यापेक्षा काँग्रेससोबत बोला, चर्चा करा. जिथं जिंकता येतील, त्या जागा घेऊयात”, असंही संजय निरुपम म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाने केलेली २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली आहे. अशोक चव्हाणांनीही २३ ही संख्या जास्त असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray demand 23 seats in loksabha but congress denied to give sanjay nirupam says sgk