जालन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक नेते जालन्यात जाऊन आंदोलकांना भेटले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही शनिवारी (२ सप्टेंबर) रात्री उशिरा जालन्यात जाऊन आंदोलक आणि जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “चित्र एकदम विदारक आहे. आपला वैभवशाली महाराष्ट्र त्याची परंपरा आहे. ही परंरपरा सध्याचं बेकायदेशीर सरकार पायदळी तुडवत आहे. लोकांवर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. एका ताईचं डोकं केवढं फोडलं आहे. सुदैवाने ती वाचली. तिला रुग्णालयात आणायला रुग्णवाहिकाही नव्हती. तिचं डोकं फुटलं, नाक फुटलं. कुणाच्या डोक्यात छर्रा घुसला आहे. कुणाच्या चेहऱ्यावर मारहाण झाली आहे, छर्रा लागला आहे. हे कोणतं सरकार आहे?”

“असं बिनडोक आणि निर्घृण सरकार जनतेने कधी पाहिलं नाही”

“हे आंदोलक दहशतवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करतात. ते आंदोलन करतानाही उपोषणाच्या माध्यमातून स्वतःला त्रास करून घेत आहेत. त्यांची हे डोकी फोडत आहेत. असं हे बिनडोक आणि निर्घृण सरकार महाराष्ट्राच्या जनतेने कधी पाहिलं असेल, असं मला वाटत नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घेतलाच पाहिजे”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “सगळ्यांकडून माहिती मिळते आहे की, सगळं शांततेत सुरू असताना अचानक एक फोन आला आणि त्यानंतर कारवाई सुरू झाली. हा फोन कुणाचा होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जेव्हा गोवारींवर असा हल्ला झाला होता, तेव्हा मुधकर पिचडांचा राजीनामा घेतला गेला होता. तसाच यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेलाच पाहिजे. ही जनतेची भावना आहे आणि आमचीही तीच मागणी आहे.”

हेही वाचा : “…तर संसदेत मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी; म्हणाले, “गणेशोत्सवात…”

“आंदोलकांवरील गंभीर गुन्हे तत्काळ मागे घ्या”

“आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत ते तत्काळ मागे घेतले पाहिजे. कारण त्यांनी कुठेही शांतता बिघडवली नव्हती. त्यांच्यावर कुणाच्या आदेशाने हल्ला झाला हे पहिलं शोधावं लागेल. कारण मीही सरकार चालवलं आहे. सरकार चालवताना मुख्यमंत्र्याला राज्यात कुठं काय सुरू आहे याची खडानखडा माहिती गुप्तचर विभाग किंवा पोलीस देत असतात. कुणाचं आंदोलन कसं सुरू आहे, त्यात कोण आहे, कसं आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना असते,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray demand resignation of devendra fadnavis for lathicharge in jalna maratha protest pbs