Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojna Scrutiny Criteria And Next Instalment : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी थेट आर्थिक लाभ देणारी (दर महिन्याला १,५०० रुपयांचा हप्ता) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. निवडणुकीवेळी महायुतीच्या नेत्यांनी घोषणा केली होती की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास ‘लाडकी बहीण योजने’तील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा हप्ता देऊ. आता राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपध घेतली असून त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला आहे. नवं सरकार आल्यानंतर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू झालं आहे. मात्र, लाडक्या बहिणींना त्यांचा या योजनेतील पुढील हप्ता मिळालेला नाही. तसेच २,१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळेल याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सरकारने ही योजना तात्काळ चालू करावी, महिलांना २,१०० रुपयांचा हप्ता दिला जावा, ही योजना चालू करताना आवडती नावडती असा भेदभाव करू नये, अशा मागण्या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आम्ही सर्वच पक्ष वेगवेगळे मुद्दे घेऊन निवडणूक लढलो. आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. परंतु, ज्यांनी सरकार स्थापन केलंय त्यांच्याकडे माझी मागणी आहे की त्यांनी जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या होत्या, जी आश्वासनं दिली होती ती आता पूर्ण करायला सुरुवात करावी. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही आमची आश्वासनं नक्कीच पूर्ण केली असती. आता जे सरकार आलंय त्यांनी त्यांची आश्वासनं पूर्ण करावी”.

हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारकडे महत्त्वाची मागणी

उद्धव ठाकरे म्हणाले, “या सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. मात्र हे सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या आमदारांची व नावडत्या आमदारांची जास्त चर्चा चालू आहे. परंतु, ते बाजूला ठेवून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करायला हवी. या योजनेचे पहिल्या पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या योजनेवर स्थगिती आणली. मात्र, आता निवडणूक पार पडली आहे. आचारसंहिता संपली आहे. निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी जी योजना आणली होती त्या योजनेअंतर्गत महिलांना पैसे दिले गेले नाहीत. ती योजना तात्काळ सुरू केली पाहिजे. तसेच १,५०० नव्हे तर महिलांच्या खात्यात २,१०० रुपये जमा करायला हवेत. कारण असं आश्वासन त्या लोकांनीच निवडणुकीच्या आधी दिलं होतं.

हे ही वाचा >> “…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली

आता प्रेम वाढवावं, सांगितल्याप्रमाणे २,१०० रुपयांचा हप्ता द्यावा : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, योजना सुरू करून जे काही एक-दोन महिन्यांचे पैसे महिलांना देणं बाकी आहे ते पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यांवर वळवावेत. ही योजना परत सुरु करताना आवडती-नावडती असं न करता सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत. मी मधल्या काळात काही बातम्या वाचल्या. या योजनेला काही निकष लावणार, महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार, एकाच घरात एकाच महिलेला या योजनेचे पैसे मिळणार, अमुक करणार, तमुक करणार, हे सगळं वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येतेय की हे सगळे यांचे निवडणूक जिंकण्यासाठीचे डाव होते जे आता उघडे पडले आहेत. माझी सरकारकडे मागणी आहे की त्यांनी बहिणींमध्ये आवडती नावडती असा भेदभाव करू नये. ते तसं करू शकत नाहीत. त्यांनी तसं करता कामा नये. जे काही निकष आधी लावले होते त्या अंतर्गत महिलांना पैसे दिले जावे. निकष बाजूला ठेवून त्यांचं वाढतं प्रेम दाखवत महिलांच्या खात्यावर २,१०० रुपये जमा करावेत.