राज्य सरकारने पीककर्जावर व्याजमाफीचा योग्य निर्णय घेतला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकताना कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथील सभेत बोलताना दिला.
ठाकरे यांच्या मराठवाडा दुष्काळ दौऱ्याचा प्रारंभ बुधवारी लातुरातून झाला. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यास ५० टँकरचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते टाऊन हॉलच्या मदानावर करण्यात आला. जिल्हय़ात १०० ग्रामपंचायतींना ३ हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांचे वाटपही या प्रसंगी करण्यात आले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे व रवींद्र गायकवाड, शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोरे, संजय सावंत, बळवंत जाधव, संतोष सोमवंशी, नागेश माने आदी उपस्थित होते.
‘‘दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाडय़ातील मंडळींना भेटायला मी आलो आहे. लांबलचक भाषण करणार नाही. नुसते भाषण ऐकून तुमचे ना पोट भरणार ना तहान जाणार. शिरा ताणून नुसतेच बडबडायचे ही शिवसेनेची परंपरा नाही. आमच्या परीने दुष्काळग्रस्तांसाठी करता येईल ते आम्ही करीत आहोत. १३७ वर्षांतील या वर्षीचा दुष्काळ सर्वात मोठा आहे. पेरणीच न झालेले इतिहासातील हे पहिले वर्ष आहे. राज्य सरकारने कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला असला, तरी कर्ज अद्यापि जिवंतच आहे! राज्य व केंद्र सरकारांनी शेतकऱ्याला कर्जातून एकदाचे बाहेर काढले पाहिजे. एक पाऊल पुढे टाकून कर्जमाफी दिली पाहिजे. नाही तर कर्जदार शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘‘मी अकारण सरकारवर टीका करणार नाही. मात्र, सरकारचे जे पटत नाही त्याबाबत निश्चित बोलेन. शिवसेनेतर्फे कन्यादान योजनेंतर्गत ८००पेक्षा अधिक सर्वधर्मीय विवाह लावले. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही तर मदतीस धावून जाणारे हिंदुत्व आहे. सरकारच्या योजनेत लोकवाटा भरण्याची रक्कम नाही म्हणून अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. शिवसेनेने अनेक ठिकाणी लोकवाटपाची रक्कम भरुन लोकांना लाभ मिळवून दिला. लातुरात आमच्यासाठी वर्षांनुवष्रे राजकीय दुष्काळ आहे. मात्र, आम्ही माणुसकी जपणारी माणसे आहोत. निवडणुकीत अपशय आले म्हणून मदतीसाठी हात आखडता घेत नाही. शेतकऱ्यांनी या दुष्काळावर मात करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. हेही दिवस जातील,’’ या अवघड परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिवसेना आपल्यासोबत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा