जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा समाजबांधव उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी घडली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. अशातच राज्यातल्या विरोधी पक्षांचे नेते अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत. काही वेळापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. हे आंदोलन ज्या मनोज जरांगे पाटील (मराठा मोर्चाचे समन्वयक) यांच्या नेतृत्वात सुरू आहे त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात अडीच वर्ष आपलं (महाविकास आघाडीचं) सरकार होतं. या काळातही आरक्षणासाठी वेगवेगळी आंदोलनं झाली. मराठा समाजाचा लढा सुरू होता. परंतु, आपल्या सरकारच्या काळात असा लाठीमार झाला का? मुंबईतही आंदोलनं झाली, आझाद मैदानात आंदोलनं झाली, परंतु, आंदोलकांवर कोणी लाठ्या उगारल्या नाहीत. या सरकारच्या काळातच असं का घडतंय?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, केंद्र सरकारने ऐन गणेशोत्ववात संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. मोदी सरकारने अधिवेशनासाठी काय मुहूर्त शोधलाय बघा. हिंदुंच्या सणांना आडवं कसं जायचं हे पाहतायत. हे अधिवेशन त्यांनी का बोलावलं आहे याची माहिती नाही. मी म्हणेन आता अधिवेशन बोलावलंच आहे तर मग या अधिवेशनात सर्व समाजांना न्याय द्या.
हे ही वाचा >> Elections 2023 : निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का, आजी-माजी आमदारांसह १० नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे दिल्ली सरकारचे सगळे अधिकार तुम्ही काढून घेतले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही संसदेत तो विषय तुम्ही पुन्हा आणलात. त्यानंतर तुमच्या पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही तो निर्णय उलटा फिरवलात. आता संसदेत तसाच निर्णय घेऊन मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर समाजांना न्याय द्या. जे समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्या सर्वांना न्याय द्या. हे गरिंबांचं सरकार आहे ना? मग हे लोक हिंदू नाहीत का? यांच्यावर लाठीहल्ला केलात, यांचा गुन्हा काय आहे? जर तुम्ही येत्या अधिवेशनात या समाजांसाठी निर्णय घेणार असाल तर तुमच्या अधिवेशन घेण्याच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. माझ्या समाजाच्या भावनेचा आदर करा.