Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे हे दुतोंडी मांडूळ आहेत, त्यामुळे दिल्लीपुढे झुकतात अशी बोचरी टीका केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भाषणात ज्या प्रकारे ‘..आणि म्हणून’ हे शब्द उच्चारतात त्याची त्यांनी खिल्ली उडवली. इतकंच नाही तर महाराष्ट्र लुटायला आलेला दरोडेखोर म्हणजे अमित शाह असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
तीन महिने थांबा कलेक्टर कुठे पाठवतो बघा
“दुबार मतदार नोंदणीचा मु्द्दा आत्ता राजन विचारेंनी उपस्थित केला आणि तो योग्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगूनही काही केलेलं नाही. तीन महिने थांबा, सरकारी जिल्हाधिकारी मिंध्याचे कलेक्टर मी कुठे पाठवतो बघा. या चांडाळ चौकडीला तुरुंगाचे गज मोजायला लावू. ही काही गंमत नाही. ठाणे उभं राहिलं त्यामागे शिवसेनाप्रमुखांचं प्रेम आणि शिवसैनिकांची अपार मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती.” अशी टीका उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केली.
हे पण वाचा- ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसेचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकल्या
एकनाथ शिंदे म्हणजे दुतोंडी मांडूळ
“नमकहराम टूची उत्सुकता आम्हाला आहे, नागाचा अपमान मला करायचा नाही पण हे मांडूळ आहे गांडूळ नाही दुतोंडी मांडूळ. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे (एकनाथ शिंदे) तिकडे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही, फोन आला की यांची पँट खराब होते. जसे याल तसे या असा फोन आला की पळतात. नशीब पँट घातलेली असते.” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंवर केली. तसंच त्यांच्या ‘आणि म्हणून..’ ची खिल्लीही उडवली.
“अरे सुपारी तोंडातून थुंक आणि बोल की सरळ..”
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “आपली मशाल ही लोकशाही गाडणाऱ्यांचं बूड जाळणारी आहे. लोकशाहीची हत्या होते आहे तरीही जे डोळ्यांना पट्टी लावून बसलेत त्यांना धडा शिकवणारी आपली मशाल आहे हे विसरु नका. शाखांच्या बोर्डवर, भिंतीवर आता मशाल दिसली पाहिजे. आपल्याला मतदान करायचं म्हणून चुकून अनेकांनी धनुष्यबाणाला मतदान केलं. धनुष्यबाणाशी नातं आहे, होतं. पण आज चोर धनुष्य बाण घेऊन आला आहे. त्याला मशालाची धग दाखवायची आहे. आणि म्हणून..मी आणि म्हणून असं सरळ म्हणतोय हां, कुंथत नाही. कण्हणं, कुंथणं असं आपल्याला येत नाही. ये जो है, वो मशाल जो है..वो मशाल है, वो धनुष्यबाण जो है.. असं नाही अरे सरळ बोल ना. तोंडातली सुपारी आधी थुंक. ये जो है, ये जो है काय लावलं आहे? आणि म्हणून, काहीतरी पोट साफ करायचं औषध यांना (एकनाथ शिंदे) द्या, हे औषधच या निवडणुकीत यांना द्यायचं आहे. मला माहीत आहे ठाणेकर औषध देण्यात हुशार आहात. मला आता ठाण्यात ठणठणीत विजय पाहिजे. ” असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd