माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘सामना’ च्या पॉडकास्टला मुलाखत दिली. खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. तसंच शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असेल तर राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? असा प्रश्नही विचारला आहे. यावर आता भाजपाने जोरदार टीका केली आहे. आजची मुलाखत ही फिक्स्ड मॅच असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. तर बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी मिठी नदीत बुडवले या आशयाची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.
काय म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी?
मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट! हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे.
उद्धव ठाकरे तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात.कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हाच तुम्ही नीतीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून नीती-अनीतीच्या गप्पा तुम्ही मारु नका.
हे पण वाचा- “बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं मुलाखतीत?
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे पाहायला मिळालं.
Uddhav Thackeray: धनुष्यबाण की मशाल? लोकांमध्ये संभ्रम; उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर
एनडीएच्या बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ (INDIA) नावाची एक आघाडी झाली आहे, या आघाडीला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी (विरोधकांच्या बैठकीच्या दिवशी) आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि ३६ पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली.