मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा सांगितला जातोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ठाकरे की शिंदे? याचा वाद निवडणूक आयोगसमोर सुरु आहे. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हंही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी घेतला. या निर्णयानंतर ‘मातोश्री’वर अश्रूंचा बांध फुटल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात रविवारी ( ९ ऑक्टोबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून झाली. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंदारे यांनी जोरदार भाषण केले. चिन्ह गोठवल्यावर ‘मातोश्री’वर शिवसेना नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
“…पण उद्धव ठाकरेंनी जिद्द सोडली नाही”
भास्कर जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरेंवर अनेक संकट आली, कधी डगमगले नाहीत. नात्या गोत्यातले, घरातले लोक संधी साधून बसले आहेत, पण उद्धव ठाकरेंनी जिद्द सोडली नाही. मात्र, मातोश्रीवर जाण्यापूर्वी काही पत्रकारांनी म्हटलं, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी पाहिलं. त्यानंतर आम्ही दुपारी गेलो, तेव्हा उद्धव ठाकरे ते दाखवत होते, मला काही झालं नाही. पण, त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते लपवू शकले नाहीत. त्यांना मी विचारलही, साहेब तुम्हाला काय झालं, कितीही लपवा मात्र तुमच्या डोळ्यातलं पाणी लपवू शकत नाही.”
हेही वाचा – “शिवसेना आणि बाळासाहेब हवेत, पण…”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
“बाळासाहेब ज्यावेळी देवाची पूजा करायचे, तेव्हा…”
“तिथेच बाळासाहेबांसोबत काम करणारे रवी म्हात्रेही उद्धव ठाकरेंबरोबर होते. ते म्हणाले, बाळासाहेब ज्यावेळी देवाची पूजा करायचे, तेव्हा ते धनुष्यबाणालही पुजायचे. आज ते धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, म्हणून आमच्या डोळ्यात पाणी आहे,” असा शिवसैनिकांच्या काळजाला हात घालणारा प्रसंग भास्कर जाधव यांनी सांगितला.