Uddhav Thackeray on Kiren Rijiju’s Claim about Waqf Board : “डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सांगितलं होतं की कर (टॅरिफ) कमी करावे नाहीतर आम्ही देखील कर लादू, त्यानुसार आता अमेरिकेने भारतावर कर लादला आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडलं”, असा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर टीका करत आहेत. या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत केलेला एक दावा खोडून काढला आहे. त्यासाठी त्यांनी लोकसत्ता डॉट कॉमच्या बातमीचा हवाला दिला. त्यांनी पत्रकार परिषदेत ही बातमी वाचून दाखवली.
उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवली लोकसत्ता ऑनलाइनची बातमी
उद्धव ठाकरे म्हणाले, “किरेन रिजिजू काल लोकसभेत म्हणाले की देशात मोदी सरकार आलं नसतं तर वक्फ बोर्डाने संसदेची जागा देखील हडपली असती. मात्र, त्यावर लोकसत्ता ऑनलाइनने एक बातमी केली आहे. ‘वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकवायची होती का?’ असं त्या बातमीचं शीर्षक आहे. या बातमीत लिहिलं आहे की वक्फ बोर्डानं खरंच संसदेवर दावा केला होता का? तर त्याच्या उत्तरात म्हटलं आहे की दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “मी १८ वर्षांपासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलांवर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही.”
किरेन रिजिजू काय म्हणाले होते?
किरेन रिजिजू लोकसभेतील चर्चेवेळी म्हणाले होते, “आज आमच्या सरकारने हे वक्फ सुधारणा विधेयक आणलं नसतं तर दिल्ली वक्फ बोर्डाने आपल्या संसदेच्या इमारतीवर आणि आसपासच्या जागेवर दावा करण्याची तयारी केली होती. १९७० पासून दिल्लीत एक खटला चालू होता. दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्स (केंद्र सरकारी कर्मचारी संकुल), संसद भवनासह अनेक गावे व मालमत्तांवर दिल्ली वक्फ बोर्डाने दावा केला होता. ही आमची मालमत्ता आहे असं त्यांचं म्हणणं होतं. न्यायालयात याप्रकरणी खटला चालू होता. तत्कालीन यूपीए सरकारने वक्फने दावा केलेली सगळी जमीन डीनोटिफाय (जमिनीवरील अधिसूचना मागे घेणे) करून वक्फ बोर्डाला दिली होती.”
उद्धव ठाकरेंनी वाचली लोकसत्तेतील बातमी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेवेळी लोकसत्ता वर्तमानपत्रातील एक बातमी वाचून दाखवली. ते म्हणाले की “भाजपाने दावे केले आहेत की अनेक मुस्लिमांनी वक्फ विधेयकाचं समर्थन केलं आहे, तशी पत्रे देखील आम्हाला पाठवली आहेत. मात्र यावर किती विश्वास ठेवायचा? आजच्या लोकसत्तेत एक बातमी आहे. या बातमीत म्हटलंय की नक्षलवाद्यांच्या शांतीप्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण! आता केंद्र सरकारने कारवाया थांबवून चर्चा करावी, असे आवाहन करणारे पत्रक बुधवारी प्रसारमाध्यमांना प्राप्त झाले आहे. मात्र या पत्राच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.”