राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधी १५ दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय उलथापालथी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील अपघातांच्या मुद्द्यावरून सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी यावेळी महामार्गांवरील अपघातांचा मुद्दा उपस्थित करत सरकार निर्दयी झाल्याची टीका केली. “प्रस्तावात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा उल्लेख आहे. त्या लोकांना आर्थिक मदत करावी आणि चूक करणाऱ्याला शिक्षा करावी असं म्हटलंय. मदत व्हायलाच हवी. कार्यकर्त्यांसाठी तळमळणारा नेता अशा भावनेतून आम्ही एकनाथ शिंदेंकडे बघतो. पण त्यांच्यातही राजकारण किती भिनलंय याचं उदाहरण सांगतो”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी एका गंभीर घटनेचा उल्लेख विधानसभेत केला.
“मुंबई-गोवा महामार्गावर गुहागर मतदारसंघातल्या एका जाधव कुटुंबातल्या माणसाच्या गाडीचा अपघात झाला. कंत्राटदारामुळे अपघात झाला. २०११ साली काम सुरू झालं, पण अजूनपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही म्हणून अपघात झाला. एका घरातली, एका गावातली १० माणसं जागेवर गेली. आम्ही तिथे गेलो, तेव्हा एका चितेवर सात प्रेतं ठेवलेली होती”, असं भास्कर जाधवांनी सांगितलं.
किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी…
खासगी वाहनाचं कारण सांगून मदतीसाठी नकार?
“गेल्या अधिवेशनात मी राहुल नार्वेकरांना त्यांच्या चेंबरमध्ये भेटायला गेलो. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना विनंती केली की राजकारणासाठी तुम्ही आमचे विकासाचे पैसे थांबवलेत. पण एका कुटुंबातली १० माणसं मेली, त्यांना काहीतरी मदत करा. तेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितलं की भास्करराव, आम्ही मदत करतो. पण खासगी वाहनात त्यांचा अपघात झाल्यामुळे मदत होईल की नाही ते पाहावं लागेल म्हणून मला सांगितलं”, असा दावा जाधव यांनी केला.
“इतके तुम्ही निर्दयी झालात?”
“त्यानंतर पुण्याला बेंजो पार्टी गेली, तिथे १३ माणसं अपघातात गेली. त्यांना मदत केली. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या पुरस्कार वितरणात १४ माणसं गेली, त्यांना मदत केली. समृद्धी महामार्गावर २५ माणसं अपघातात मेली, त्यांना मदत केली. १५ दिवसांपूर्वी दापोली तालुक्यात ८ माणसं खासगी गाडीतच अपघातात गेली, त्यांनाही मदत केली. पण गुहागरमधली माणसं माझ्या मतदारसंघातली होती. त्यांना मदत केली गेली नाही. सात माणसांना एका चितेवर अग्नी दिला. हे सरकार आहे की कोण आहे? इतके तुम्ही निर्दयी झालात? खरंतर तुमच्याबद्दल दुसरा शब्द वापरला पाहिजे”, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.
“एवढे तुम्ही निष्ठुर झालात? आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर राहिलो, म्हणून तुम्ही त्या लोकांना एक रुपयाची मदत करत नाही. कुठे फेडणार आहात ही पापं? निर्लज्जपणाचा कळस आहे. चार चार वेळा मी भेटलो. तेव्हा उदय सामंतांनी मला मेसेज पाठवला की आपण ताबडतोब त्यांना मदत करतोय. त्यानंतर त्या लोकांना मदत केली”, असंही भास्कर जाधव म्हणाले.