मुंबईत आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. एकीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधले परस्परविरोधी गट एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून उभे असताना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय आरोप-प्रत्यारोप व टोलेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गट व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबरोबरच पंकजा मुंडेंचाही दसरा मेळावा आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकताच ठाकरे गटानं आपल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक गाणं लाँच केलं असून त्यात बाळासाहेब ठाकरेंनी आमदार बंडखोरीबाबत केलेल्या भाष्याचा समावेश करण्यात आला आहे.
२४ ऑक्टोबर अर्थात येत्या मंगळवारी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही गटांतील नेते कशा प्रकारे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, याची उत्सुकता त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांना लागली आहे. याची झलक मेळाव्याच्या आधी दोन्ही बाजूंनी सादर करण्यात आलेल्या गाण्यांमधून दिसू लागली आहे. ठाकरे गटानं ‘दैवत आपलं ठाकरे’ या नावाने दसरा मेळाव्यासाठी नवीन गाणं लाँच केलं आहे.
काय आहे गाण्यामध्ये?
“पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे” अशा शब्दांनिशी ठाकरे गटाकडून आपल्या कार्यकर्त्यांना गाण्याच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या तिघांकडून घेण्यात आलेल्या सभांची दृश्य समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याव्यतिरिक्त या व्हिडीओमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्याची छायाचित्रांचा समावेश आहे.
“हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे अन्…”, शिंदे गटातील नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका
शिवसेनेचे आमदार फुटल्यावर काय करायचं? हे सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या एका भाषणातील काही वाक्यांचा समावेश या गाण्यात करण्यात आला आहे. “उद्या जर तुमच्या हातात सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर एक सांगतो, यापुढे शिवसेनेचा एकही आमदार फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा”, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
“उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा”
दरम्यान, “मला सांभाळलंत, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या”, या बाळासाहेबांच्या शब्दांचाही समावेश या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.